दुपारपर्यंत ४० टक्के मतदान, भवानीपुरात ममतादीदी विरुद्ध सुवेंदू अधिकारी मैदानात
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक मानल्या जाणार्या दुसर्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. पश्चिम बंगालमधील आठ जिल्ह्यांमधील १४२ जागांसाठी मतदान सुरू आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत, या मतदारसंघांमध्ये ३९.९७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. या टप्प्यात राज्यातील एकूण २९४ जागांपैकी उरलेल्या १४२ जागांसाठी मतदान होणार असून, दक्षिण बंगालमधील बालेकिल्ल्यात आपले वर्चस्व टिकवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि सत्ता खेचून आणण्यासाठी भाजप यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
सध्या पश्चिम बंगालमधील आठ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या १४२ मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. बंगाल निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात, सकाळी ११ वाजेपर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, अवघ्या चार तासांतच ३९.९७ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदानाची नोंद पूर्व बर्धमान जिल्ह्यात झाली असून, तिथे सकाळी ११ वाजेपर्यंत ४४.५० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. याउलट, ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात केवळ ३७.२७ टक्के मतदान झालेही आकडेवारी सरासरी मतदान टक्केवारीपेक्षा कमी आहे.
या टप्प्यातील सर्वात लक्षवेधी लढत भवानीपूर मतदारसंघात होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे निवडणूकीच्या मैदानात आहेत. दीदी आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणार की सुवेंदू अधिकारी मैदान मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसर्या टप्प्यात प्रामुख्याने कोलकाता आणि आसपासच्या ८ जिल्ह्यांमधील १४२ मतदारसंघांचा समावेश आहे.
राज्यातील एकूण २९४ जागांपैकी उरलेल्या १४२ जागांसाठी मतदान
उत्तर २४ परगणा: ३३ जागा
दक्षिण २४ परगणा: ३१ जागा
हुगळी: १८ जागा
नदिया: १७ जागा
पूर्व वर्धमान: १६ जागा
हावडा: १६ जागा
कोलकाता (उत्तर व दक्षिण): ११ जागा
३.२१ कोटींहून अधिक मतदार १,४४८ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील होणार्या मतदानातून हे ठरणार आहे की, तृणमूल काँग्रेस दक्षिण बंगालमधील आपला बालेकिल्ला कायम ठेवते की भाजप आघाडी घेऊन सत्ता काबीज करते. कोलकातासह सहा जिल्ह्यांमधील १४२ विधानसभा जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात ३.२१ कोटींहून अधिक मतदार १,४४८ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
दुसर्या टप्प्यात १४२ जागांसाठी मतदान
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या १४२ जागांसाठी एकूण ३,२१,७३,८३७ नोंदणीकृत मतदार आहेत. यामध्ये १,६४,३५,६२७ पुरुष, १,५७,३७,४१८ महिला आणि ७९२ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. सर्व मतदारांना छायाचित्र ओळखपत्रे जारी करण्यात आली आहेत. मतदारांपैकी ३,२४३ जण १०० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, तर ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १,९६,८०१ आहे. याशिवाय, १४६ अनिवासी भारतीय () मतदार आणि ३९,९६१ सेवा मतदारही या टप्प्यात मतदान करतील.
१, ४४८ उमेदवारांचे भवितव्य ठरले
दुसर्या टप्प्यात एकूण १,४४८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात १,२२८ पुरुष आणि २२० महिलांचा समावेश आहे. कोणत्याही जागेवर तृतीयपंथी उमेदवार नाहीत. १४२ जागांपैकी १०७ जागा सर्वसाधारण प्रवर्गात आहेत, तर ३४ जागा अनुसूचित जाती आणि एक जागा अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर मतदारसंघात सर्वाधिक १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तर हुगळी जिल्ह्यातील एकाच जागेवर सर्वात कमी पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
केंद्रीय दलाच्या २, ४०७ कंपन्या तैनात
कोलकाता व्यतिरिक्त, नादिया, पूर्व बर्धमान, हुगळी, दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि हावडा या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. ३९,३०१ प्राथमिक आणि १,७०० सहायक मतदान केंद्रांसह एकूण ४१,००१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय दलाच्या २,४०७ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, सुरक्षेसाठी पश्चिम बंगाल पोलीस आणि कोलकाता पोलीस कर्मचारी देखील तैनात केले जातील. मतमोजणी ४ मे रोजी होईल. पाच वर्षांपूर्वी, भाजपच्या आक्रमक प्रचारानंतरही, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने दक्षिण बंगालमध्ये जबरदस्त कामगिरी करून सत्ता कायम राखली होती. या निकालाने हे स्पष्ट झाले की पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दक्षिण बंगाल जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.